महसुली कर्मचारी आज सामूहिक रजेवर
सातारा – सातारा जिल्ह्यातील महसूल विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनस्तरावरुन तत्त्वत: मान्यता मिळाली आहे पण, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने महसुली वर्ग-3 कर्मचारी उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी सामुहिक रजेवर जाणार आहेत, असा इशारा राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागात वर्ग – 3 कर्मचारी संघटनेच्या मागण्या प्रलंबित होत्या. शासनाने 20 ऑगस्ट 2013 ते 3 जानेवारी 2019 पर्यंत तब्बल सात वर्षात राज्य शासनाने महसुली कर्मचारी संघटनेबरोबर तब्बल नऊ बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये आंदोलनावेळी तत्वत: मान्य केलेल्या मागण्यांचे शासननिर्णय काढण्यासंदर्भात वारंवार आश्वासने देण्यात आली. मात्र, केंद्र व राज्य सरकार बदलले तरी शासनाकडून महसूल कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही.
भाजप-सेना-मित्र पक्षाच्या राज्य शासनाचा निषेध म्हणून सातारा जिल्ह्यातील महसुली वर्ग-3 कर्मचाऱ्यांना उद्या बुधवार दि. 28 रोजी सामुहिक रजेवर जाणार आहेत. तरीही राज्य शासनाने 4 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी व शासननिर्णय न झाल्यास दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील नायब तहसिलदारांपासून तलाठ्यांपर्यंत सर्वच महसूली कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी सुनील बारवे यांच्याकडे याबाबत महसूल संघटनेचे सागर कारंडे, संतोष झनकर, संतोष भोसले, पंकज शिंदे, आश्पाक शेख, प्रशांत म्हस्के यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी लेखी निवेदन दिले आहे. दरम्यान, “सब का साथ, सब का विकास’ अशी पोकळ घोषणाबाजी करणारे भाजप सत्तेवर आहे. जे पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करीत होते. त्यांच्याशी हात मिळवणी करू लागले आहेत. त्यांच्याडून अशा गोष्टी अपेक्षित असल्या तरी बहुजन वंचित आघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्वांचे प्रश्न सोडविले जातील असे आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी स्पष्ट केले आहे.