पुणे – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार तसेच विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींकडून गेल्या दीड महिन्यांपासून मोर्चेबांधणी, रणनीती, संवाद सुरू आहे. आता त्यांच्या सौभाग्यवतींनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी, हळदी- कुंकू मेळावा, प्रदर्शनात सौभाग्यवती आवर्जून हजेरी लावत आहेत. त्यामुळे आखाडा तापण्यापूर्वीच आजी- माजी लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार, अशा तीन जणांच्या सौभाग्यवती मैदानात उतरल्या आहेत.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात शिरूर आणि हवेली तालुक्यातील 39 गावांचा समावेश आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये अशोक पवार यांनी बाजी मारली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात सत्तेत होती. पूर्व हवेलीतील 39 गावांमध्ये त्यांचे प्राबल्य असल्यामुळे त्यावेळी विधानसभा खेचून आणली. त्यानंतर 2014 मध्ये शिरूर- हवेलीचा आखाडा आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मोट बांधून आमदारकी मिळविली होती. त्यावेळी युती आणि आघाडी तुटल्यामुळे आमदार पाचर्णे यांना मतविभागणीचा लाभ पथ्यावर पडला होता.
माजी आमदार पवार यांनी पाच वर्षांत विस्कटलेली मोट संघटितपणे बांधली. लोकसभेची निवडणूक पवारांसाठी जमेची बाजू ठरली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित माजी खासदार शिवाजीराव आढळराव व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढत झाली. यावेळी कोल्हे यांच्या रूपाने मतदारसंघात लाट आली. या लाटेत मतदारांनी पारंपरिक आढळराव पाटलांना डावलून डॉ. कोल्हे यांच्या पारड्यात मतदानरूपी दान टाकले. माजी आमदार पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पत्नी पूजा कंद यांचे दौरे दोन्ही तालुक्यात वाढले आहेत. त्यात प्रत्येक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांचा संपर्क सुरू आहे. पूजा कंद या पदवीधर आहेत. मालती पाचर्णे यांची वक्तृत्व शैली प्रभावशाली आहे. साधी राहणी मतदारांना भुरळ पाडत आहे. शिरूर तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांकडे तीन सौभाग्यवतींनी मोर्चा वळविला आहे. ही गावे चुरशीच्या लढतीत निर्णायक ठरणार आहेत.
सभापती व्हाया गावपातळीवर “कनेक्ट’
शिरूर तालुक्यात माजी आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्राबल्य आहे. त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत करिष्मा दाखविल्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांना कृषी विभागाचे सभापतिपद मिळाले. त्यामुळे शिरूर तालुक्यातील प्रत्येक गाव आणि वाड्या- वस्त्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. प्रत्येक कार्यक्रमांतून गावपातळीपर्यंत पोहोचल्या असल्यामुळे त्याचा लाभ त्यांनी उठविला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुजाता पवार यांनी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अशोक पवार यांच्या कुटुंबीयांशी कनेक्ट आहेत.
शिरूर तालुक्यात पूर्व हवेलीची “एंट्री’
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पत्नी पूजा कंद यांनी हवेलीतील 39 गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचपाठोपाठ शिरूर तालुक्यातील गावांवर फोकस टाकला आहे. शिरूर शहरासह त्यांनी आसपासच्या गावांत कार्यक्रमांची हजेरी लक्षवेधी ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रदीप कंद हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. कंद यांची चर्चा मतदारसंघात होत आहे. त्यादृष्टीने ते सक्रिय झाले असल्यामुळे शिरूर तालुक्यात मशागत सुरू केली आहे. प्रभावी भाषणशैलीमुळे पूजा कंद यांनी मतदारांवर छाप पाडली आहे. कंद कुटुंबीय शिरूर तालुक्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
विकासकामांचा आलेख जमेची बाजू
शिरूर- हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी आमदारकी पटकाविल्यानंतर मतदारसंघात विकासकामांचे दान पारड्यात ओतले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा मतदारांशी थेट संपर्क पाचर्णे यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. साधी राहणी आणि मतदारांशी थेट संपर्क, महिलांशी संवाद आगामी चुरशीच्या लढतीत पोषक ठरणार आहे.