कोपरगाव -अध्यक्षपदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करून शिर्डी संस्थांनच्या माध्यमातून श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचा विकास करू. शिर्डीचे आंतरराष्ट्रीय महत्व वृद्धिंगत होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शुक्रवार सकाळी त्यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे सर्व नवनिर्वाचित विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. आ. आशुतोष काळे म्हणाले, साई संस्थानच्या अध्यक्षपदीनिवड ही करोना संकटात निःस्वार्थ भावनेतून करोना रुग्णांची करीत असलेल्या सेवेचा साईबाबांचा आशीर्वाद आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा छोटासा कार्यकर्ता या नात्याने मी करीत असलेल्या सामाजिक कार्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व पक्षश्रेष्ठींनी दखल घेवून माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असून शिर्डीत भाविकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. संस्थानचे विश्वस्त, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांचे मार्गदर्शन घेवून शरद पवार मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करणार असे ते म्हणाले.