मुंबई : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी जपानला गेले होते. त्यांचा विमानतळावरचा अंगात सदरा, धोतर. डोक्यावर गांधी टोपी आणि पायात चपला अशा पेहराव आणि सोबत त्यांची पत्नीही नऊवारी, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत आणि पायात वाहाना घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. जपान दौऱ्यावरुन परतल्यानंतर झिरवळ यांनी दौऱ्याच्या काही आठवणी सांगितल्या. सध्या त्यांचा एक किस्सा सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे.
झिरवळ म्हणाले, “जपान दौरा हा माझ्याच नाही, तर माझ्या पूर्वजांच्याही जीवनातला मोठा अनुभव. मी या दौऱ्यादरम्यान माझा पोशाख बदलणार नाही, हे आधीच ठरवलं होतं. दरम्यान या दौऱ्यावर असताना नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा फसलेला स्वेटर खरेदीचा अनुभव सांगितला आहे. “मी माझ्या पत्नीसोबत स्वेटर खरेदी करायला एका दुकानात गेलो. तिथे आम्हाला एका स्वेटरची किंमत २८ हजार रुपये सांगितली. हे ऐकून माझी बायको म्हणाली, एवढ्या पैशात तर घरातील सर्वांना स्वेटर घेऊनही पैसे उरतील. आपल्या नाशिकला तर १२०० रुपयात स्वेटर मिळतो, असे ती म्हणाली आणि आम्ही दुकानातून काहीच न घेता बाहेर पडलो.
नाशिकच्या थंडीत पत्नी काम करते. त्यामुळे तिला थंडीचं एवढं काही नव्हतं पण आग्रहामुळे दुकानात स्वेटर घ्यायला गेलो. यानंतर मी आता किंमती विचारायच्या नाही, थेट खरेदी करायची असे ठरवून पत्नीला वस्तू खरेदीसाठी आग्रह धरला. मात्र ती काही केल्या तयार होईना. शेवटी नातवंडासाठी काही खेळणी घेतली आणि भारतात परतल्याचे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पक्ष कोणताही असो, पण या साधेपणाचं मनमोकळं कौतुक केलंच पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या काळात जपानमध्ये विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी जपानला गेले होते. त्यांचा विमानतळावरचा मराठमोळ्या पोशाखातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता.