मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली असून भाजप आणि केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही असे म्हटले आहे. तसेच ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली.
संजय राऊत यांनी आपल्याला धमकावले जात असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असे म्हटले होते. याविषयी बोलताना, “मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यसभा उमेदवारीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात मी सगळी माहिती दिली होती, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार होत्या परंतु, त्यांनी ईडीकडे कार्यालयात हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे. वेळ वाढवून मागणारे पत्र त्यांनी ईडीला लिहिले असून यात ५ तारखेपर्यंतचा अवधी मागितला आहे.