भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा पलटवार
पुणे – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे निर्माण झालेल्या सहानभूमीच्या लाटेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी आधी आपल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या अपयशाची चिंता करावी. आम्हाला राजकारण शिकवू नये, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने महापालिकेत घेतलेल्या 23 गावांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी मुळीक यांनी आपल्या अपयशाची चिंता करावी, अशी टीका केली होती. त्याला मुळीक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुळीक म्हणाले की, 2014 मध्ये तुपे यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर आता ते हडपसरमधून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे राज्यभर तयार झालेल्या वातावरणामुळे निवडून आले आहेत. ते सध्या ज्या मतदारसंघात आमदार आहेत. त्या मतदारसंघाचा विकास भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे.
तर, तुपे यांना वर्षभरात काहीच करता आलेले नाही. या उलट माझा या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी मी अवघ्या काही हजार मतांनी पराभूत झालेलो आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे मगच आम्हाला राजकारण शिकवावे, अशी जोरदार टीका यावेळी मुळीक यांनी केली. तसेच, गावांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी राजकारण करून स्वतःचे अपयश लपवू पाहात आहे.
जिल्हा परिषदेवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता असूनही त्यांना या गावांचा विकास करता आला नाही. आताही एक रुपयाचाही विकास निधी न देता, कोणतेही नियोजन न करता गावांच्या समावेशाची घाई केली जात आहे. यातून राजकीय हित साधण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. पण त्यात त्यांना यश येणार नाही. याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.