कर्जत ( विजय डेरवणकर ) – आगामी काळात पंचायत समिती, नगर पालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नेते मंडळी कामाला लागली आहेत. पक्ष संघटन बळकटीवर नेत्यांनी भर दिला असून पक्षांतर्गत चढाओढीही सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकांचे हे वर्ष कोणासाठी लाभदायक ठरणार? 2024 यामध्ये राजकीय नेत्यांचे भविष्य पणाला लागणार आहे. यामध्ये कोण मारणार बाजी?, कोण उधळणार गुलाल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) सत्तेत आहे. मात्र कर्जत–खालापूर मतदारसंघात महायुतीतील चित्र अलबेल नसल्याचे दिसत आहे. महायुतीतीलच नेतेमंडळी एकमेकांवर टिकास्त्र करत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पक्षाचे वर्चस्व अबादित ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करीत आहेत.
कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची जिल्हा, तालुका स्तरावरील विविध समत्यांवर नियुक्तीचा होलसेल धमाका सुरू आहे. तसेच गावभेटीचे दौरे सुरू असून त्याद्वारे समस्या जाणून घेत नागरिकांशी संवाद साधत आहेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचवत आहेत. नवीन कार्यकर्ते देखील छोटे कार्यक्रम राबवत बॅनरबाजी करीत आहेत. त्यामुळे नविन चेहऱ्यांना संधी मिळणार का? अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे, नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार सुरेश लाड, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना (उभाठा गट) जिल्हा अध्यक्ष नितीन सावंत, भाजपा कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत.