पुणे – अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा काही तासांवरच आला आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अयोध्यानगरी जसी सजली आहे, तसा संपूर्ण देशभर जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्यातही अनेक रस्ते, गल्ल्या, मंदिरे, गृहनिर्माण सोसायटी या सगळ्या ठिकाणी राममय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरांसमोर रांगोळ्या, रामाचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज, आकर्षक रोषणाई या सगळ्यांनी पुणे सजले आहे. गल्लोगल्लीही तोरणे, पताका लावण्यात आल्या असून, रामाभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.
मंदिरे सजली
पुणे हे मंदिरांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. शहरात अनेक रामाची मंदिरे आहेत. तुळशीराम मंदिर, रहाळकर राम मंदिर या अगदी जुन्या मंदिरांपासून ते अनेक ठिकाणी असलेल्या राम मंदिरांमध्ये तर यज्ञ, विधी होणार आहेतच; परंतु अन्य देवतांच्या मंदिरांमध्येही उत्सव साजरे करण्यात येणार असून, त्याचीही तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी या सगळ्यांनी पक्षादेशाप्रमाणे मंदिरे स्वच्छ केली. हा स्वच्छता प्रोग्रामच त्यांनी केला होता. त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मंदिरे स्वच्छ झाली.
प्रसादाची निमंत्रणे
अनेक रामभक्तांनी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये प्रसाद, महाभोजन अशी जंगी तयारी अनेक मंडळांनी, मंदिर संस्थांनी केली आहे. त्यामुळे यासाठी जाहीर निमंत्रणेही देण्यात आली आहेत.
भाजपेयींची लगीनघाई
भाजपेयींची हा सोहळा म्हणजे लगीनघाईच ठरली आहे. आपापल्या मतदारसंघात या माजी नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, आमदारांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी जाणे आणि उपस्थिती दर्शवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याचीही तयारी भाजपेयींनी केली आहे.
आरत्या, कीर्तनांची मांदियाळी
फुलांनी सजवलेल्या या मंदिरांमध्ये आरत्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. अनेकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठीही भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे. कीर्तनांचीही मांदियाळी अनेक ठिकाणी करण्यात आली असून, त्यासाठी कीर्तनांचे ग्रुप्स सज्ज झाले आहेत. रामाची गाणी रचून, त्याला चाल लावून ती गाणे असे अनेक प्रकारही काही गायकांनी केले आहेत. त्यामुळे या निमित्ताने अनेक गायक, संगीतकार, गीतकार सोशल मीडियावर दिसत आहेत.
घरोघरीही तयारी
अनेक घरांमध्येही या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने गोड-धोड पदार्थ तयार करणे, रांगोळ्या या गोष्टी तर आहेतच; परंतु याशिवाय फ्लॅटच्या टेरेसमध्ये गुढ्यांप्रमाणे भगवे ध्वज लावण्यात आले असून, घरांवर रोषणाई करण्यात आली आहे. काही सोसायटींमध्ये संपूर्ण इमारतींवरच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण सोसायटीचेच वातावरण भक्तीमय आणि मंगलमय झाले आहेत.
दुकानांवर रोषणाई
साड्या, ड्रेस अशा विविध दुकानांवर व्यापार्यांनी सजावट केली आहे. दुकानांची साफसफाई पासून ते फुलांची सजावट करण्यात आली असून, यामाध्यमातून त्यांनी ग्राहकांनाही आकर्षित केले आहे. सराफ व्यापार्यांनीही या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. चांदीचे देव्हारे, रामाच्या मूर्ती, पूजेच्या वस्तू या सगळ्या वस्तू ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
मोठमोठ्या रांगोळ्या
राम मंदिर, रामाच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण करणार्या रांगोळ्या अनेक संघटना, संस्थांनी काढल्या आहेत. रमणबाग शाळा, रांका ज्वेलर्स दुकानाचे कॅम्पस याशिवाय अनेक मोठमोठ्या हॉलमध्ये अशा सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. या रांगोळीच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मेंहदीच्या माध्यमातून सेलिब्रेशन
थीमबेस्ड मेंहदी हा प्रकार सध्या खूप ट्रेण्डी झाला आहे. हातावर मेंदी काढणे ही देखील आता साधी गोष्ट राहिली नाही. त्यामुळे थीम सांगून मेंहदी बनवणारे अनेक कलाकार आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे या अयोध्या, राममंदिर ही थीम देखील सध्या खूप प्रचलित झाली आहे.