Saudi Smash 2024 (Saudi Arabia) :– जागतिक टेबल टेनिस (WTT) सौदी स्मॅश स्पर्धेत अव्वल भारतीय महिला पॅडलर मनिका बत्राची (Manika Batra) चमकदार मोहीम गुरुवारी संपुष्टात आली. उपांत्यपूर्व फेरीत (quarterfinals) जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या जपानच्या हिना हयाताकडून (Hina Hayata) तिला पराभवाचा धक्का बसला. जपानच्या हयाताने जागतिक क्रमवारीत 39व्या क्रमांकावर असलेल्या मनिका हिचा 39 मिनिटांत 4-1 (7-11, 11-6, 11-4, 13-11, 11-2) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
त्याआधी 28 वर्षीय भारतीय खेळाडू मनिका हिने सौदी स्मॅशमध्ये पहिल्या फेरीत स्पेनच्या अँड्रिया ड्रॅगोमनवर 3-0 (11-6, 13-11, 11-8) असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर 32व्या फेरीत, मनिकाने पहिला गेम गमावल्यानंतर पुन्हा दमदार पुनरागमन केले आणि पुढील तीन गेम जिंकून चीनची अव्वल खेळाडू आणि ऑलिम्पिक पदकविजेती जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वांग मन्यूचा पराभव केला आणि 38 व्या मिनिटात सामना 6-11, 11-5, 11-7,12 -10 असा जिंकला होता.
त्यानंतर जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानी असलेल्या नीना मित्तेलहॅमचा पराभव करत बात्राने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तिने 22 मिनिटांत जर्मनीच्या नीना मिटेलहॅम हिला 11-6, 11-9, 11-7 असे पराभूत केले होते.
स्पर्धेतील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर मनिकाला ITTF जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी असलेली भारतीय महिला म्हणून तिचा दर्जा परत मिळण्याची आशा आहे.