पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दोन दशकांत शहराचे नागरीकरण वाढताना दुर्लक्ष केल्यामुळे शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नद्या प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. केंद्रातील भाजप सरकारने या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला असून, शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा- मुठा पुनरुज्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
त्यासाठी केंद्र शासनाने ९०० कोटींचा निधी अनुदान स्वरूपात दिलेला असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील मोरे विद्यालय परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, ऍड वर्षा डहाळे,
पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडके, अपर्णा लोणारे, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, शंतनू खिलारे पाटील, विठ्ठल बराटे, हर्षवर्धन मानकर, दीपक पवार, सचिन थोरात, अजय मारणे, अभिजीत राऊत, संदीप मोरे, आशुतोष वैशंपायन यांचा प्रमुख सहभाग होता.
मोहोळ म्हणाले, मुळा- मुठा पुनरुज्जीवन प्रकल्पात ११ नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ५५ किलोमीटर लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या आणि दररोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता ३९६ दशलक्ष एमएलडीने वाढणार आहे. सन २०४६ मध्ये ९९ लाख लोकसंख्येचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.
या प्रकल्पाशिवाय 500 कोटी रुपये खर्च करून जुन्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अत्याधुनिकरण सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ पैकी दहा प्रकल्पांचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, आयात केलेली विद्युत यंत्रणा पुण्यात पोहोचली आहे. सन २०२५ च्या मध्यास काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.