पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे. पुढची पाच वर्षे जनसामान्यांच्या आशा आकांक्षा, सुरक्षा, विकास यांची विचार करण्याची निवडणूक आहे. एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आहेत.
साथ सबका विकास, या भावनेतून देशाचा विकास होत असून आपण केवळ एक खासदार निवडून देत नाही तर पुण्याकरीता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत, याचा विचार करून पुणेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना मतदान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बाणेर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहरअध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, गणेश बिडकर, अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, लहु बालवडकर यावेळी उपस्थित होते. भाजपच्या युवकांसाठीच्या संकल्प पत्राचे तसेच अमोल बालवडकर यांच्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासासाठी १८ पक्षांची महायुती तर इंडीया आघाडीकडे २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही शिवाय, विकासासाठी कोणतेही व्हिजन नाही. तसेच, गेल्या दहा वर्षांत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत.
शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा आधी, गेल्या पन्नास वर्षांत सरकारने शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी आले पण राहायला जागा, पिण्याला पाणी नव्हते, सांडपाणी व्यवस्था नव्हती. घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी, पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्राने पुण्याला निधी दिला.
पुण्यात मेट्रो धावतेय, त्याचे नेटवर्क तयार होत आहे. इलेक्टिक बस आल्या, स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे दिली. त्यामुळे सुनियोजित शहर तयार होईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.