बाजारात अजूनही साहित्य उपलब्ध होत नसल्याने काम बंद
हडपसर – लॉकडाऊन शिथिल करताना बांधकामे सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अशा कामांवर काम करण्यासाठी मजूर तसेच साहित्यासह अन्य घटक उपलब्ध होत नसल्याने परवागनी मिळूनही बांधकाम व्यावसाय अद्यापही बंद आहे.
लॉकडाऊनमुळे गेली सव्वा महिने बांधकामे बंद आहेत. त्यातच अन्य क्षेत्रालाही याचा फटका बसल्याने बांधकाम क्षेत्रालाही याची झळ बसणार आहे. हडपसर परिसरात नव्या प्रकल्पांची संख्या अधिक असली तरी बहुतांशी कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. बांधकामांना शासनाकडून परवानगी मिळालेली असली तरी आता परप्रांतीय मजुरांनाही घरी जाण्यास परवानगी दिली गेल्याने अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावाची ओढ लागली आहे, अशा अवस्थेत त्यांना थांबविणे कठीण आहे. याच कारणातून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी परवानगी मिळाली असली तरी कामे सुरू केलेली नाहीत.
हडपसर परिसरात ज्या ठिकाणी किरकोळ कामे आहेत तेथे मजुर मिळत नाहीत. बांधकामे सुरू करण्यासाठी कामगारांबरोबरच साहित्याचीही गरज आहे. सेंटरिंगचा व्यावसाय करणारेही त्यांच्या गावी आहेत. त्यामुळे इतरत्र साइटवर पडलेला माल एखादं-दुसऱ्या साइटवर नेणेही अवघड जात आहे. याकामी लागणारे मजूरही कमी पडत आहेत. मजुरांमधील अस्वस्थता, साहित्याची उपलब्धता, माल वाहतुकीतील अडचणी, स्थापत्य, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा अनेक समस्याना बांधकाम व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे.
असुरक्षिततेची भावना…
बांधकाम प्रकल्पांवरच राहिलेल्या मजुरांमध्ये काम बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी किराणा व धान्य पुरवले, आरोग्य तपासणी केली असली तरी रोजगार नसल्याने मजुरांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.