मुंबई – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवारांनी ‘मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल’, असे विधान एका मुलाखतीत केले होते. यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. “झोकून काम करणारा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हालाही आवडेल,” असे त्या म्हणाल्या होत्या. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, “त्यात वाईट काय आहे मला जर कुणी चांगलं म्हणत असेल, तर मला त्याचं समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलं म्हणतील. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याला काय उत्तर देऊ शकतो हे मला कळलेलं नाही,”असे म्हणत त्यांनी यावर जास्त बोलणे टाळले.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का?’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी आपली भूमिका मांडली. “मला कोणीही मुख्यमंत्री झालं तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल..’, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं होतं.