त्रिनिदाद :- वेस्ट इंडिजने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारताविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. रोवमन पॉवेल हाच संघाचा कर्णधार असून एकदिवसीय मालिकेत कर्णधार असलेल्या शाई होपला विंडीजच्या टी-20 संघात पुन्हा संधी देण्यात आली आहे.
होपसह ओशेन थॉमसलाही संघात पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. होप एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार आहे पण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून तो वेस्ट इंडिजसाठी एकही टी-20 खेळलेला नाही. त्याच वेळी थॉमस अखेरचा टी-20 सामना 2021 साली खेळला होता.
भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत होपने सरस कामगिरी केली होती. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 43 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 63 धावांची खेळी केली होती. होपने फेब्रुवारी 2022 साली भारताविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर अखेरचा टी-20 सामना खेळला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी त्रिनिदादला खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना गयानामध्ये तर अखेरचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहेत.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने संध्याकाळी 8 पासून)
पहिला सामना – 3 ऑगस्ट (त्रिनिदाद)
दुसरा सामना – 6 ऑगस्ट (गयाना)
तिसरा सामना – 8 ऑगस्ट (गयाना)
चौथा सामना – 12 ऑगस्ट (फ्लोरिडा)
पाचवा सामना – 13 ऑगस्ट (फ्लोरिडा)