वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथे पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या भाडळे वस्ती (अनुसया पार्क) परिसरातील एका २० वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे. लक्षणे जाणवू लागल्याने तिची कोरोना टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली. तिला उपचारासाठी वाघोली येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणी घरातच असायची फक्त भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असे. भाडळे वस्ती परिसरामध्ये वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून पोलीस व वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आढावा घेण्यात येत आहे.
वाघोलीमध्ये आत्तापर्यंत २३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून यापैकी १७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ६ रुग्ण अॅकटीव आहेत.
भाजी विक्रेते उडवताहेत सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा…
वाघोलीमध्ये पुणे-नगर महामार्गालगत तसेच मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात असल्याचे दिसून येते. सुरक्षेच्या दृष्टीने ठोस काळजी देखील भाजीपाला विक्रेत्यांकडून घेतली जात नाही. यामुळे भाजीपाला विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांवर बंधने आणली नाही तर यामाध्यमातून वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. नागरिकांनी देखील भाजीपाला खरेदी करताना गर्दी न करता सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.