सोरतापवाडी(प्रतिनिधी) – उरुळी कांचन परिसरात आज दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरेगाव मुळ येथील रहिवासी असलेली महिलेचा (वय 36) रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. तर महिलेच्या मुलाचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता तो आज रिपोर्ट येऊन मुलाचा (वय 14) तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
उरुळी कांचन येथील डाळिंब रोडवरील एक व्यक्ती (वय 45) पॉझिटिव्ह आली असून पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. मूळची बेंगळुरू येथील राहणारी व्यक्ती कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत कामाला होती. राजीनामा दिल्यानंतर बेंगळुरू येथे विमानाने जाण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेटसाठी एका खासगी दवाखान्यात तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला. तिच्या संपर्कातील एका व्यक्तीला होम क्वारंटाइन करण्यात आले असून, उद्या स्वॅब घेऊन पाठविले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.