वाघोली (प्रतिनिधी): केसनंद (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन संभाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने जाधव यांची निवड करण्यात आली.
तत्कालीन उपसरपंच प्रणव ढोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अलका हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीमध्ये उपसरपंचपदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या वेळेस तीन अर्ज माघारी घेतल्याने सचिन जाधव यांचा एकमेव अर्ज राहिला होता. एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी काम पहिले. निवडीनंतर गावामध्ये भंडाऱ्याची उधळण करीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. वाघोली व केसनंद परिसरातील ग्रामस्थांनी सचिन जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गावाची सर्वसमावेशक विकास कामे करण्यास प्रयत्नशील असून राहिलेली पेंडिंग काम पूर्ण करण्यावर भर राहील असे जाधव यांनी सांगितले.