दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधेची निर्मिती
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यानंतर आता दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी एक सुविधा निर्माण केली आहे. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या 80 वर्षे किंवा त्यावरील तसंच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगानं व्होट फ्रॉम होम ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा मतदारांना आता मतदान केंद्रावर न जाता घरबसल्या मतदान करता येणार आहे.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीपासून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याव्यतिरिक्त दिल्लीतील 1.44 कोटी मतदारांना आपल्या मतदान केंद्रांवर किती मोठी रांग आहे, तसेच किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची माहितीही मिळणार आहे. व्होटर व्हेरिफिकेशन कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमने एक दौरा केला होता. या टीमने सर्व निवडणूक अधिकारी, पोलीस आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतल्याची माहिती दिल्ली निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. रणबीर सिंह यांनी दिली.
या बैठकीत त्यांनी 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच दिव्यांग मतदारांची नावे व्हेरिफाय करण्याचे आदेश दिले असल्याचेही ते म्हणाले. तसेच यावेळी मतदारांसाठी एक नवे ऍप लॉंच करण्यात येणार आहे. बूथ ऍप अेम या ऍपचे नाव असेल. या ऍपद्वारे कोणताही मतदार आपल्या मतदान केंद्रावर किती मोठी रांग आहे किंवा कोणी आतापर्यंत किती मतदान केलं याची माहिती घेऊ शकतो.
मतदान केंद्रांवर कोणताही मतदार मतदान करण्यासाठी आला तर हेल्प डेस्कनजीक त्याचा फोटो आणि ओळखपत्र स्कॅन करून घेतले जाणार आहे. याद्वारे कोणती व्यक्ती मतदानासाठी गेली याची माहिती ऍपवर मिळेल. त्या मतदान केंद्रांवर किती मतदारांची नोंदणी आहे आणि किती मतदारांनी मतदान केले आहे, याची माहिती याद्वारे मिळणार आहे.