कचरा डेपो हटविण्यासाठी कर्जतला राष्ट्रवादीचे आंदोलन

कर्जत – कर्जत-कापरेवाडी रस्त्यालगतच्या गट क्रमांक पाचमधील अनधिकृत कचरा डेपो हटविण्यात यावा, तसेच या जागेत शासनाने केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाची माहिती मिळावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून या प्रश्‍नावर निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात माजी सभापती नानासाहेब निकत, सुनील शेलार, अशोक जायभाय, बबन नेवसे, भूषण ढेरे, इकबाल काझी, रज्जाक झारेकरी, जाकीर सय्यद, किशोर पवार आदी सहभागी झाले आहेत. अनधिकृत कचरा डेपो हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरसेवक सचिन घुले, धडाका आघाडीचे महारुद्र नागरगोजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजपच्या ताब्यात असलेल्या कर्जत नगरपंचायतीकडून निवेदनाची दखल न घेतल्याने राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान तहसीलदार सी. एम. वाघ तसेच नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र त्यातून तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. या प्रश्‍नावर उद्या (दि.7) कर्जत येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भूषण ढेरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.