11 नोव्हेंबरपासून नवी व्यवस्था अंमलात येणार नाही
पुणे – नंबर पोर्टेबिलिटीची व्यवस्था आधुनिक करून तिची अंमलबजावणी 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे अगोदरच जाहीर केले होते. मात्र, यासाठी तांत्रिक तयारी पूर्ण झाली नसल्यामुळे अंमलबजावणी नंतर केली जाणार आहे.
एखादी मोबाइल कंपनी आपल्याला चांगली सेवा देत नाही असे एखाद्या ग्राहकाला वाटल्यास त्या ग्राहकाला आपला क्रमांक कायम ठेवून दुसरी कंपनी निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. याला नंबर पोर्टेबिलिटी असे म्हणतात. सध्या एखाद्या ग्राहकाने कंपनी बदलण्याची विनंती केल्यानंतर त्याला नव्या कंपनीची सेवा मिळण्यास सात दिवसांचा कालावधी लागतो. नव्या पद्धतीत हा कालावधी कमी करून दोन दिवसांचा करण्यात येणार होता. दूरसंचार नियामक अधिकाराणी म्हणजे ट्रायने गेल्या पंधरवड्यात या संबंधात माहिती दिली होती. त्यानुसार नंबर पोर्टेबिलिटीची व्यवस्था 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार होती. या काळामध्ये या व्यवस्थेचे आधुनिकीकरण केले जाणार होते. त्यानंतर नवी व्यवस्था 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती.
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या नसल्यामुळे 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यानही जुन्या पद्धतीनुसार नंबर पोर्टेबिलिटीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. मात्र, नवी व्यवस्था कधी सुरू होणार असे विचारले असता या संबंधात सध्या कुठलीही तारीख देता येणे शक्य नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. तांत्रिक तयारी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील नवी तारीख जाहीर करण्यात येईल. तांत्रिक तयारी पूर्ण झाल्याशिवाय नवीन व्यवस्था सुरू करणे बरोबर होणार नाही. त्यामुळे ग्राहकांचा त्रास वाढेल. याकरिता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच हे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे. पोर्टेबिलिटी बरोबरच ग्राहकांना इतर सुविधाही व्यवस्थित मिळाव्या यासाठी
आधुनिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. बऱ्याच ठिकाणी कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित नसते त्यावेळी ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही, अशावेळी दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याचा प्रयत्न ग्राहक करीत असतात. या व्यवस्थेमुळे ग्राहकांना त्याचा लाभ होतो.