पिंपरी -ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने कसदार अभिनयाची हुकूमत असलेला दमदार अभिनेता हरपला. लहान-मोठ्या पडद्यासह रंगभूमी गाजविणाऱ्या या कलाकाराच्या एक्झिटने देशभरातील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांचे पिंपरी-चिंचवडसोबत देखील खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते. नाटक, कार्यक्रमांसोबतच मित्र-आप्तेष्टांना भेटण्यासाठी ते अनेकदा उद्योगनगरीत येऊन आपल्या आठवणींचा साठा ठेऊन गेले आहेत.
मैत्री, माणुसकीला जगणारा कलाकार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले की, संकेत मिलनाच्या या नाटकाच्या प्रसंगी त्यांचे आणि माझी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. तेव्हापासून आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अभियनाच्या क्षेत्राबरोबरोच ते मैत्रीला, माणुसकीला आणि प्रेमाला जागणारे होते. सामाजिक बांधिलकी जाणिव ठेऊन कृतिशील कार्य करणारा कलाकार हरपला.
एसी बंद तरीही प्रयोग सुरूच
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे सहकार्यवाह राजू बंग म्हणाले की, मी माझ्या मुलांचा या नाटकाचा प्रयोग चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये मे महिन्यात होता. त्या वेळी तांत्रिक कारणामुळे प्रेक्षागृहातील एसी बंद होता. त्या वेळी विक्रम गोखले यांनी थेट रसिकांशी संवाद साधत म्हणाले की, मी शो करणार आहे. ज्यांना बसणे शक्य नाही, त्यांनी आपल्या तिकीटाचे पैसे घेऊन जावेत. मात्र, प्रेक्षागृहातील एकही रसिक बाहेर गेला नाही. एसी बंद असतानाही विक्रम गोखले यांनी शो केला आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून दाद दिली.
कृष्णाची भूमिका अजरामर
कथ्थक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते म्हणाले की, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे ऐकून धक्का बसला. त्यांच्या अशा अकस्मित जाण्याने चित्रपट सृष्टीत एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. चित्रपट सृष्टीतील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे. विक्रम गोखले यांची बहीण मिना गोखले यांच्यामुळे त्यांचा संपर्क आला. चित्रपटातील कृष्णाची त्यांची भूमिका अजरामर झाली.
आयुष्यतील पहिला पुरस्कार
पिंपरी चिंचवड कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, संस्थेच्या वतीने त्यांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी माझ्या आयुष्यातील हा पहिला पुरस्कार आहे. मी पुरस्कार स्वीकारत नाही, पण तरुण मुले एकत्र येऊन पुरस्कार देत आहेत म्हणून हा पुरस्कार मी अभिमानाने स्वीकारत आहे, शासनाचे कुठलेही पुरस्कार मी आयुष्यात स्वीकारले नाही, असे विक्रम गोखले म्हणाले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कलाकारांना जगण्याचे मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भसे म्हणाले की, कसदार अभिनयाची हुकूमत असलेला दमदार अभिनेता हरपला. त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि नाट्यसृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. ते कलाकारांनी स्वतःच्या आर्थिक नियोजनाची तयारी करताना फक्त मानधनावर अवलंबून न राहता इतर मार्ग देखील शोधावे असे ते सर्व कलाकारांना सांगत असे.