नगर – जिल्ह्यात आता कांद्याला मिळणारे भाव कमी झाले आहेत. महिनाभरापूर्वी कांदा दराने साडेतीन हजारांचा टप्पा पार केला होता. आता मात्र भाव दोन हजारांपर्यंत कमी झाले आहेत. शनिवारीही (दि.26) नेप्ती उपबाजारातील लिलावात एक नंबर कांद्याला सरासरी 1700 ते 2100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाले.
बाजार समितीत शनिवारी 39 हजार 108 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1700 ते 2100 रुपये, दोन नंबर कांद्याला 1300 ते 1700 रुपये, तीन नंबर कांद्याला 700 ते 1300 रुपये आणि चार नंबर कांद्याला 200 ते 700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला. दरम्यान, शनिवारी भावात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले. याआधी गुरुवारी 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. आज शनिवारी मात्र 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. म्हणजेच, दोन दिवसांत कांद्याच्या दरात शंभर रुपये वाढ झाली आहे. सध्या कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे भावही कमी होत असल्याचे सांगण्यात आले.