नगर – जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. फक्त बाधित जनावरेच नाही तर जनावरांच्या मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे टेन्शन वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2515 जनावरे या आजाराने दगावली आहेत. राज्य सरकारने पशुपालकांना मदत म्हणून आतापर्यंत 1305 प्रस्ताव मंजूर केले असून 3 कोटी 45 लाख रुपये मदत केली आहे.
जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रसार ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे. आता मात्र आजाराचा वेग वाढला आहे. आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. आता तर दिवसागणिक बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूतही वाढ होत आहे. लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे या संकटात त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.
लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. मदतीसाठी रोजच प्रस्ताव येत आहेत. प्रस्ताव आल्यानंतर पुढील कार्यवाही होऊन संबंधित पशुपालक शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत 1305 प्रस्ताव मंजूर केले आहेत. या पशुपालकांना 3 कोटी 45 लाख रुपये मदत दिली आहे. आणखीही प्रस्ताव येत आहेत. या प्रस्तावांनाही मंजुरी देऊन मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आता हा आजार उत्तर भारतातील राज्यात आटोक्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात आजाराचा वेग वाढला आहे. त्यामुळे येथे आजार का आटोक्यात येत नाही. राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील जिल्ह्यांचे दौरे केले होते. नगर जिल्ह्यातही दोन अधिकाऱ्यांचे पथक आले होते. या पथकाने जिल्ह्यातील आजाराचा आढावा घेतला.
साडेसात हजार जनावरे आजारी
जिल्ह्यात आजमितीस 27 हजार 395 जनावरांनी या घातक आजारावर मात केली आहे. तर अजूनही 7 हजार 644 जनावरे आजारी आहेत. या जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून औषधोपचार केले जात आहेत. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 37 हजार 554 जनावरे या आजाराने संक्रमित केली आहेत.
झेडपीलाही टेन्शन
राज्य सरकारप्रमाणेच जिल्हा परिषदेकडूनही लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र, ही मदत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येत आहे. जनावरांच्या मृत्यू संख्येत वाढ होत असल्याने मात्र जिल्हा परिषदेच्या अडचणी वाढल्या आहेत. मदत देण्यासाठी आता निधी कसा आणायचा, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. दुसरे म्हणजे, आणखी बऱ्याच जणांना मदत देणे बाकी आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अडचणी वाढल्या आहेत.