Vijay Shivtare । लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. सुरुवातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असं वाटत होतं. पण आता याठिकाणी शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीदेखील शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही लढत आता तिरंगी होणार आहे. त्यातच शिवतारे यांनी घोषणा केल्यानंतर सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
शिस्तभंगाच्या कारवाईचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश Vijay Shivtare ।
विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एन्ट्री घेतल्यानंतर बारामतीच्या राजकारणाचे पूर्ण चित्रंच पालटले आहे. मी बारामतीतून निवडणूक लढणारच, असा चंगच विजय शिवतारेंनी बांधला आहे. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळेच त्यांच्याच अडचणीत वाढ होणार आहे. शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.
बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायची, असा निर्णय महायुतीनं एकमतानं घेतला आहे. म्हणजेच, शिवसेनेनं महायुतीतला घटक पक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत विजय शिवतारे जर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील तर तो सरळ सरळ शिस्तभंग ठरतो. त्यामुळेच शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचं सांगण्यात येतंय.
शिवतारेंच्या बंडाविरोधात अजित पवार गट आक्रमक Vijay Shivtare ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समजावलं आहे. मात्र तरीही त्यांनी बंडखोरी केली तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.