रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा प्रचार ऐन रंगात आला असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे (Ajinkya More) यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. खेड पोलिस स्टेशनमध्ये अजिंक्य मोरे यांच्याविरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल केलेल्या विविध 7 गुन्ह्यांचा दाखला देत तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणाची खेडच्या प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. त्यात अजिक्य मोरे यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. साळवी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने अजिंक्य मोरे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याने चर्चेत आले होते. बाळासाहेब असते, तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचं काय केलं असतं? असे वक्तव्य अजिंक्य मोरे यांनी केले होते.
राजन साळवी यांच्यावर आरोप काय आहेत ?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून आतापर्यंत सात ते आठ वेळा चौकशी झाली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, रत्नागिरी – सिंधुदुर्गात भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या प्रचार ऐन रंगात आला असतानाच आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई केली जात आहे.