श्रीकांत कात्रे
सातारा लोकसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची
राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून होणार विजयासाठी निकराचे प्रयत्न
सातारा – विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभेची सातारा मतदारसंघातील पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित झाल्यामुळे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचे “टेन्शन’ आता वाढले आहे. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने सातारा लोकसभेची जागा रिक्त झाली होती. ही पोटनिवडणूक आता विधानसभेबरोबरच घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी घेतला. लोकसभा पोटनिवडणूक भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेची होणार असल्याने विधानसभा उमेदवारांवर त्याचा ताण आपोआपच येणार आहे.
उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करतानाच विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक व्हावी, असा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा उल्लेखही टाळला होता. त्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये नाराजी होती. त्यानंतर विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. तसा प्रस्ताव आयोगाकडे देऊन पाठपुरावा सुरू ठेवला. त्याला यश मिळाले. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान व 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार हे निश्चित झाले आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. आता विधानसभेबरोबर सहा मतदारसंघांतील मतदारांना लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे.
सातारा, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या सहा विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. विधानसभेसाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. सहा मतदारसंघात असणारा उमेदवारांपैकी पक्षीय पातळीवर एक उमेदवार उदयनराजेंचा समर्थक असेल तर एक उमेदवार विरोधक असणार आहे. आपला प्रचार करताना विधानसभेच्या उमेदवाराला विधानसभा आणि लोकसभा दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करावे लागणार आहे. निकालानंतर आकडेवारीची मोठी चर्चा होते. त्यावेळी कुणी कुणाचे काम केले आणि कुणी नाही, यावरच चर्चेत भर असतो. तो ताण उमेदवारावर सतत राहणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करून उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस उदयनराजेंच्या विरोधात विजयासाठी कसून सर्व ते प्रयत्न करणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तगडा उमेदवार देऊन या लढ्यात राजेंच्या पराभवासाठी प्रयत्न होईल तर दुसऱ्या बाजूला भाजप उदयनराजे यांच्या विजयासाठी वाटेल ते प्रयत्न करेल, यात साशंकता नाही. या दोन पक्षांतील चुरस पोटनिवडणुकीच्या प्रतिष्ठेसाठी लागणार असल्याने विधानसभेच्या उमेदवारांना लोकसभेसाठीही तेव्हढीच ताकद द्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उदनयराजे भाजपमध्ये गेल्याने या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात बदल्याची भावना आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या विजयाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यासाठी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उदयनराजे यांच्या “होम पीच’वर म्हणजे सातारा शहरातच मोठे शक्तीप्रदर्शन केले. उदयनराजेंच्याविरोधात सक्षम आणि तुल्यबळ उमेदवार देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार निवडून आणण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न करणार, हे निश्चित आहे.
दुसऱ्या बाजूला उदयनराजे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील लोकसभेच्या मैदानात पुऱ्या तयारीनिशी उतरतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस जागा राखणार की लोकसभेच्या रिंगणात भाजपचा पहिला विजय नोंद होणार, या प्रतिष्ठेसाठी पोटनिवडणुकीतील चुरस कायम राहणार आहे. त्यामुळेच पोटनिवडणुकीतील चुरसच विधानसभेच्या उमेदवारांनाही कसरत करायला लावणार आहे. विधानसभेबरोबर होणाऱ्या या पोटनिवडणुकीचा अतिरिक्त ताण विधानसभा उमेदवारालाही तोलावा लागणार आहे.
शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कारण लोकसभेचा हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेने तो भाजपला न दिल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून उदयनराजे यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढत दिली होती. आताही विधानसभेसाठी युतीबाबतचा निर्णय निश्चित नाही. पोटनिवडणुकीसाठी युतीमध्ये काय ठरणार ते निश्चित नाही. त्यामुले शिवसेना सातारा लोकसभेची जागा भाजपला देणार की नाही, याच्या निश्चितीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.