मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित अधिकाऱ्याने अतिक्रमणविरोधी कारवाई करताना चक्क लाथ मारून अन्नाचं भांडं पाडल्याचे या व्हिडिओत दिसत आहे, या त्याच्या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या संतप्त झाल्या असून त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी संबंधित कारवाईचा व्हिडीओ शेअर करत मनपा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. माधव जगताप असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान लाथ मारून अन्नाचे भांडे पाडले आहे.
पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.@PMCPune pic.twitter.com/vKt6f0wkBI
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2023
या घटनेवर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी, “पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांचं वागणं पाहून सखेद आश्चर्य वाटलं. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
संबंधित प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल ढमाले यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून माधव जगताप यांची अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. माधव जगताप यांनी केलेलं कृत्य हे कायदा पायदळी तुडवणारे व माणुसकीला काळीमा फासणारं आहे. महागाईच्या काळात हातावर पोट असणारे नागरिक, बेरोजगार युवकवर्ग, विधवा महिला अशा वर्गाकडून रस्त्यावर हातगाडी लावून काबाडकष्ट करून जगत आहेत. ज्या बाबी अनधिकृत आहेत त्यावर कारवाई केलीच पाहिजे. परंतु असं करताना एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय अशी भूमिका अतिक्रमण विभागाची स्पष्ट दिसते.