Ajit Pawar On Rohit Pawar| बारामती लोकसभा मतदार संघातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी 5 वाजता थंडावल्या आहेत. या टप्प्यात बारामतीत महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजयीची लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या सख्ख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहेत. काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत शरद पवारांविषयी बोलताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला. रोहित पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Ajit Pawar On Rohit Pawar| यावरून अजित पवार यांनी रोहित पवार यांची भर सभेत नक्कल करत खिल्ली उडवली. “पठ्याने डोळ्यातून पाणी काढलेच. मी पण करून दाखवतो मला मतदान द्या. पण हा रडीचा डाव करू नका. हे असलं करून जमत नाही, हा रडीचा डाव आहे. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू दिले आहेत आणि तुम्ही आमच्यावर टीका करता, रडीचा डाव बारामतीकर खपवून घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले. याशिवाय मतदारांना भावनिक आव्हानांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित पवार काय म्हणाले होते? Ajit Pawar On Rohit Pawar| बारामती येथील सभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, “साहेबांशी (शरद पवार) आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो, साहेब टीव्ही पाहत होते. ते टीव्ही पाहत असताना आम्ही त्यांना काही प्रश्न केले. त्यांनी आम्हाला त्याचे उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला महाराष्ट्र आहे, तो आपल्याला घडवायचा आहे.” रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र घडवत असताना आपल्याला नविन पिढी तयार करायची आहे, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नविन पिढीही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी स्विकारण्याच्या पातळीची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द आहे,” असं म्हणत रोहित पवार हे भावुक झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांची बारामतीत सांगता सभा जोरदार रंगली. भाषणादरम्यान रोहित पवार यांना अश्रु अनावर झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेली नक्कल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेही वाचा: “भाजपला राजकारणात मुलं झाली नाहीत, त्यांना आमची मुलं” ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल