सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. तडकाफडकी राजीनामा दिल्याने शहरातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अगदी सुरुवातीपासून पक्षाच्या सोबत राहणाऱ्या आणि पक्ष वाढविणाऱ्या नेत्यालाच तडकाफडकी राजीनामा द्यावा लागल्याने पुन्हा एकदा आयाराम आणि निष्ठावंत अशी चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सन 2017 झाली भाजपाची सत्ता आल्यापासून शहरातील दोन्ही भाजप आमदारांच्या सत्ता वाटपातील संघर्षातून आज निष्ठावंत असलेल्या भाजप कार्यकर्त्याचा बळी गेला. एकनाथ पवार यांच्या या राजीनाम्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून खदखदत असलेल्या भाजपातील अंतस्थ वादाला जाहीर स्वरूप मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सन 2017 साली भाजपाची एक हाती सत्ता आली. भाजपची सत्ता आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दोन्ही आमदारांनी पालिकेतील सत्तेचे अलिखित वाटप केले होते. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष व महापौरपद तसेच विषय समित्यांची वाटणी करण्यात आली होती. ही वाटणी करत असताना एकनाथ पवार यांच्या रूपाने पक्षनेता म्हणून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षाच्या सत्ताकाळात महापालिकेमध्ये घेतले जाणारे निर्णय हे दोन्ही आमदारच घेत असल्याने पक्षनेता अथवा इतर पदावर काम करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला अथवा ज्येष्ठांना विश्वासात घेतले जात नव्हते. याबाबत जाहीर स्वरूपात नसली तरी ही खंत अनेकजण खासगी मध्ये बोलून दाखवत होते. दोन्ही आमदारांना विरोध करण्याचे धाडस कोणामध्ये नसल्याने निष्ठावंताचा हा आवाज गेली तीन वर्षे अंतर्गत स्वरुपामध्ये धुमसत होता. अखेर आज पक्षनेते एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे या वादाला जाहीर स्वरूप मिळाले आहे.
एकनाथ पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे आपला राजीनामा देत असल्याचे सांगितले असले तरी; भाजपमधील अंतर्गत वाद आणि त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंतच या राजीनामा सत्रा मागे असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेत काम करत असताना बदनामीचे वाटेकरी पक्ष आणि निष्ठावंत ठरत असताना आर्थिक हित मात्र काही ठराविक मंडळी साधत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते.
गटनेते एकनाथ पवार यांच्या राजीनाम्या मागे महापालिकेत सध्या सुरू असलेल्या गैरकारभाराचीही किनार असल्याचे बोलले जात आहे. पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज दुपारी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा महापौर माई ढोरे यांच्याकडे सादर केला; त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. असे असले तरी भाजपातील अंतर्गत वाद महापालिकेतील भ्रष्टाचार आणि सत्ता चालवत असताना निष्ठावंतांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत हीच राजीनाम्याची खरी कारणे असल्याचे भाजपातील निष्ठावंताकडून सांगण्यात येत आहे.
सत्तेची बदलती समीकरणे…
महापालिकेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सत्तारुढ पक्षनेत्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. गेल्या तीन वर्षात केवळ विरोधकांना अंगावर घेवून त्याच्या टीकेला उत्तर देण्यापलिकडे पक्षनेत्यांनी कोणतीची भूमिका निभावली नाही. आंतरिक वाद असो वा विरोधकांचे प्रहार प्रत्येक ठिकाणी तोंड देण्यास पवार यांना पुढे केले जात होते. त्यामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आज होती. पवार यांनी भाजप शहराध्यक्ष पदाची ही जबाबदारीही पार पाडली होती. नंतर मात्र शहराध्यक्ष पदाची माळ आधी चिंचवडच्या आमदारांच्या आणि आता भोसरीच्या आमदारांच्या गळ्यात पडली. आम्ही ठरवू तेच पक्षाचे धोरण आणि आम्हीच महापालिकेच्या सत्तेचा गाडा हाकणार, असा हट्ट गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. यामध्ये पवारांसह सर्वच निष्ठावंतांची गळचेपी होताना दिसत आहे.