Rashtrapati Bhavan । Delhi Police – राष्ट्रपती भवनात बॉम्ब ठेवला असून पंधरा मिनिटांत त्याचा स्फोट होणार आहे अशी धमकी देणारा एक फोन दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आल्यानंतर पोलिसांची आज एकच धांदल उडाली.
पोलिसांनी सगळी यंत्रणा कामाला लावल्यानंतर अखेर या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. रविंद्र तिवारी असे त्याचे नाव असून त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. राष्ट्रपती भवनात बॉम्ब ठेवल्याचे सांगितल्यानंतर कॉल करणाऱ्याने मोबाइल बंद केला.
त्यानंतर पोलीस दलातील अनेक टीमना अलर्ट करण्यात आले व कॉल कोणत्या नंबरवरून आला त्याची माहिती घेतानाच कुठुन आला त्याचे लोकशनही हुडकून काढण्यात आले.
कॉल करणारा एक मजुर असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर बुधवारीही एक इ-मेल आला होता. त्यात दिल्लीतील सर्व सरकारी शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
खबरदारी म्हणून सर्व शाळांची तपासणी करण्यात आली होती व अखेर हा फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला.