Prajwal Revanna : कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने (SIT) जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर महिलांचे कथित लैंगिक शोषण आणि अश्लील व्हीडिओ बनवल्याचा आरोप असून एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.
दुसरीकडे, रेवण्णा यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्णा यांना सीआरपीसीच्या कलम 41 (ए) अंतर्गत 24 तासांच्या आत एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या 47 वर्षीय महिलेने दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
कायद्यानुसार जर ते 24 तासांत एसआयटीसमोर हजर झाले नाहीत, तर त्यांना अटक होऊ शकते. एच.डी. रेवण्णा हे हजर होणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी कलबुर्गी येथे पत्रकारांना सांगितले की, जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना अटक केली जाईल.
आणखी एक महिला तक्रारदार पुढे आल्यावर गृहमंत्री म्हणाले की, “मी त्या सर्व पीडित महिलांना आश्वासन देतो की त्यांनी पुढे येऊन त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात आणि सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देईल.
दरम्यान, लूकआऊट नोटीस जारी केलेल्या व्यक्तीला परदेशातून परत येताच कोणत्याही विमानतळावरून किंवा बंदरावरून अटक केली जाऊ शकते. यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे.