पुणे – शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले.
करोना काळात पुण्यासारख्या शहरात मोहोळ यांनी चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे, तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन ते करत असलेले काम त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहभाग घेतला. आमदार सुनील कांबळे, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, सुशांत निगडे, संदीप लडकत, सनी मेमाणे जयप्रकाश पुरोहित यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.