उद्धव ठाकरे होणार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री

सर्व पक्षीय बैठकीत शिक्कामोर्तब
शनिवारी पत्रकार परिषदेत जाहिर होणार नव्या सरकारचा फॉर्म्युला

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचा मिळून स्थापन होणाऱ्या नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. राज्यात स्थापन होणाऱ्या महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तिन्ही पक्षांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे स्विकारणार किंवा नाही याकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षनेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याने गेले दोन दिवस राजधानी दिल्लीत सुरू असलेले बैठकांचे सत्र संपले असून, घडामोडीचा केंद्रबिंदू मुंबईकडे सरकला आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास पाठींबा दिल्यानंतर राज्यात सरकार स्थापन करण्याच्या घडामोडाला वेग आला असून मुंबईतही शुक्रवारी बैठकांचा सिलसिला सुरुच होता.
मुंबईत शुक्रवारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीचे मित्रपक्ष तसेच शिवसेनेची स्वतंत्रपणे बैठक पार पडली. त्यानंतर सायंकाळी वरळी येथील नेहरू सेंटर येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादीचे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. सुमारे सवा दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकारांना माहिती दिली.

नव्या सरकारमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे का, असा प्रश्न केला असता पवार म्हणाले, नेतृत्वाबाबत कोणताही प्रश्न आमच्या मनात नाही. उद्धव ठाकरे यांनी नव्या सरकारचे नेतृत्व करावे असे ठरले असून मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. आता केवळ स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा त्यांचा निर्णय जाहीर करायचा आहे, असे पवार यांनी सांगितले.

चर्चा योग्य आणि चांगल्या दिशेने – उद्धव ठाकरे
आज तिन्ही पक्षांचे नेते चर्चेसाठी एकत्र बसले. अनेक गोष्टींवर आम्ही मार्ग काढला आहे. पण आम्ही असे ठरवले आहे कि एकही मुद्दा अनुत्तरीत ठेवायचा नाही. म्हणूनच सगळे विषय आणि सर्व विषयांची उत्तरे सोडवल्यानंतरच आम्ही मिडीया समोर येऊ. पण आमची चर्चा योग्य आणि चांगल्या दिशेने चालू आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

चर्चा अजून संपलेली नाही – पृथ्वीराज चव्हाण
तिन्ही पक्षांच्या नेत्यांची आज संयुक्तपणे बैठक झाली. ही चर्चा अजून संपलेली नाही. त्यामुळे ही चर्चा उद्या, शनिवारीही सुरुच राहील. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आज शिवसेनेशी काही मुद्यावर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक होती. पण अजून काही मुद्यांवर चर्चा झालेली नसून शनिवारीच सरकारबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, शरद पवार जे बोलले ते ऑन रेकॉर्ड आहे इतकीच प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याकडे राज्याचे लक्ष
शुक्रवारी पार पडलेल्या तीन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर उद्या, शनिवारी पत्रकार परिषद होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत नवीन आघाडीबाबत सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये नव्या सरकारचा कोणता फॉर्म्युला उघड होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राबरोबरच राजकिय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.