पिंपरी – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेसोबत आता पोलिसांनीही आता कंबर कसली आहे. विदेशी पर्यटक, तसेच विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार टूर्स ऍड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस आदींकडून माहिती घेण्यात येणार आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कलम 144 नुसार प्रतिधंतात्मक आदेश काढला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने घबराटीचे वातावरण आहे. शहरातील विदेशी नागरिक तसेच पर्यटक व विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अनके वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची वेळेत आरोग्य तपासणी करून, आवश्यकतेनुसार विलगीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी हे आदेश दिले आहेत.
शहरातील सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस यांनी त्यांच्याकडील अशा नागरिकांची, पर्यटकांची माहितीची नोंद करावी, त्यासाठी स्वतंत्र नोंदवही करून संबंधित पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला ही माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार पोलिसांना अवलोकनार्थ वेळोवेळी ही नोंदवही उपलब्ध करून देण्यात यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवार, दि. 13 मार्च ते 11 मे 2020 या कालावधीसाठी हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.