विभागीय आयुक्त : 24 तासांत एकही नवा रुग्ण नाही
आणखी 59 व्यक्तींना विलगीकरण कक्षात
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मागील 24 तासांत करोनाचा नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या स्थिर असून पुणे शहरात 9 तर पिंपरी चिंचवड शहरात 7 असे एकूण 16 करोना बाधित रुग्ण आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दोन्ही शहरांतील एकूण 59 व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी दिली.
राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दुबई, सौदी अरेबिया व अमेरिका या तीन देशांमधून जर कोणी परदेशी प्रवासी इथे आले, तर त्यांच्याबाबतीत अन्य सात देशांप्रमाणेच प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे.
रविवारी रात्री विमानाने आलेल्यांपैकी सात प्रवाशांनी त्यांना प्राथमिक स्वरुपातील काही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. या प्रवाशांनी स्वतः याबाबत माहिती दिल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील डॉक्टर त्यांना तपासून आवश्यक असेल तर त्यांचे नमुने घेतील आणि नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही ठरेल. डॉक्टरांच्या मते त्यांना केवळ घरी विलगीकरण कक्षात राहणे अपेक्षित असेल, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातील व ते त्यांच्या घरी जातील. एक प्रवासी दोन महिने जर्मनीत राहिलेला होता. त्याला नायडू रुग्णालयात दाखल करून या ठिकाणी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
नागरिकांचे सर्वेक्षण युद्धपातळीवर
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्व्हे करून माहिती गोळा करत आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 125 पथके तर पिंपरी चिंचवडमध्ये 50 पथके स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत 15 हजार 803 घरांमध्ये व 52 हजार 714 लोकांचा सर्व्हे पूर्ण केलेला आहे. या पथकांना संशयित वाटलेल्या दोन जणांना सोमवारी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.