पुरी (ओरिसा) – काँग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती (Sucharita Mohanty) यांनी आर्थिक कारणास्तव आपले नाव मागे घेतले आहे. यापूर्वी इंदूरमधील काँग्रेसच्या उमेदवारानेही नामांकनानंतर आपले नाव मागे घेतले होते. सुरत लोकसभा जागेसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कमतरतेमुळे रद्द करण्यात आला आहे.
सुचरिता मोहंती यांनी शनिवारी काँग्रेस पक्षाचे तिकीट परत केले आणि दावा केला की त्यांना निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने पैसे दिलेले नाहीत. मोहंती यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना यासंदर्भात एक ईमेल पाठवला आहे. त्यांनी खासदारकीचे तिकीट परत करत असल्याचे त्यात लिहिले आहे.
निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने दिले नाही पैसे –
मोहंती यांनी लिहिले की, पुरी लोकसभा जागेवरील आमच्या निवडणूक प्रचारावर वाईट परिणाम झाला आहे कारण पक्षाने मला निवडणुकीसाठी निधी देण्यास नकार दिला आहे. ओडिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार यांनी मला निवडणूक प्रचाराचा खर्च स्वत: उचलण्यास सांगितले. पक्षाचे तिकीट परत करण्याचे दुसरे कारण म्हणजे पुरी लोकसभेच्या सात विधानसभा जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना तिकीट दिले गेले नाही. काही कमकुवत उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. अशा स्थितीत मी ही निवडणूक लढवू शकत नाही.
सुचरिता मोहंती म्हणतात की, त्या एक कार्यरत पत्रकार होत्या. त्या दहा वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झाल्या. आपली सर्व ताकद निवडणूक प्रचारात त्यांनी लावली आणि निवडणूक प्रचारासाठी लोकांकडून देणग्या घेण्याचाही प्रयत्न केला. पण त्यातही यश आले नाही. संपूर्ण लोकसभा जागेवर प्रभावी प्रचार करता यावा यासाठी पक्षाच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला केले होते.
मोहंती यांनी लिहिले की, पुरी लोकसभा जागा जिंकण्यापासून केवळ निधीची कमतरता आम्हाला रोखू शकते कारण मी स्वत: निवडणूक प्रचार सुरू ठेवू शकत नाही. मी काँग्रेसची महिला कार्यकर्तीच आहे आणि काँग्रेसची मूल्ये माझ्या डीएनएमध्ये आहेत. त्यामुळे मी अन्यत्र कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी भविष्यातही काँग्रेस कार्यकर्तीच राहीन.