प्रवाशांना अडथळा ः प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील मोरवाडी चौक ते निगडी दरम्यान असलेल्या पीएमपी बस थांब्याशेजारी पदपथांवर अनधिकृत दुकान थाटल्याने प्रवाशांना अडथळा निर्माण झाला आहे. निगडी बसस्थानकातून मोरवाडी चौकाच्या दिशेने येताना मुख्य रस्त्यावरील बसथांब्यांजवळ अनधिकृतपणे दुकाने थाटली आहेत. यामुळे, थांब्यावरील दुकानामुळे निगडीमार्गे येणारी बस पाहताना प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे. प्रवाशांना बस थांबा सोडून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.
या परिसरातून पुणे शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने थांब्यावर प्रवाशांची सतत वर्दळ असते. मात्र, अनधिकृत दुकानांमुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. शहरातील पीएमपी बसथांबे अतिक्रमणांच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बसथांब्यावर अनधिकृतपणे रिक्षा थांबत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात आता अनधिकृत दुकानेही थाटली गेल्याने प्रवाशांच्या समस्येत आणखी वाढ होताना दिसत आहे.
सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे अनधिकृत दुकाने थाटणारे हे दुकानदार प्रवाशांना आपल्या दुकानासमोर उभे राहू देत नाहीत. प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक किंवा मित्रांना दुचाकी थांबवू देत नाहीत. यामुळे आधीच रिक्षांमुळे गुदमरलेल्या बस थांब्यांवर अधिकच कोंडी होताना दिसत आहे. या गंभीर प्रश्नाकडे पीएमपी प्रशासन व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. पीएमपीच्या थांब्यावर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे.