नागरिकांनी भीतीपोटी गर्दी करू नये : पोलीस आयुक्त
पुणे – शहरात लागू करण्यात आलेले वाहतुकीवरील निर्बंध, जमावबंदी तसेच संचारबंदीबाबत पुणे पोलिसांनी लागू केलेले आदेश कायम राहणार आहेत. किराणा माल, दूध, फळभाजी, औषध विक्रेत्यांना सूट देण्यात आलेली असून, नागरिकांनी भीतीपोटी गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील दैनंदिन व्यवहार निर्बंध घालण्याचे (लॉकडाउन) आदेश दिले. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी पुढील 21 दिवस घरात थांबावे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, तसेच प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश दिले. यानंतर रात्री शहरातील किराणा माल विक्रेते,औषध विक्रेत्यांच्या दुकानांसमोर रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नागरिकांनी भयभीत होऊ नये तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित केला.
याप्रकरणी सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे म्हणाले, “शहरात वाहन वापरास तसेच वाहतुकीवर निर्बंध घालण्याबाबतचा आदेश 31 मार्चपर्यंत यापूर्वीच लागू करण्यात आला आहे. तसेच शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
यातून पोलीस, आरोग्य विभाग, रुग्ण वाहतूक, अत्यावश्यक सेवेतील वीज, पाणीपुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बॅंक, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरील पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक (किराणा माल, दूध, शेती उत्पादने, पशू खाद्या, घरपोच ऑनलाइन सेवा), वृद्धाश्रम, अपंग संस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सेवा, प्रसारमाध्यमे आणि त्यांच्या प्रतिनिधींना सूट देण्यात आलेली आहे. निवासी सोसायटीतील सुरक्षारक्षक, सफाई कामगारांना त्यांचे निवासस्थान ते कामाच्या ठिकाणापर्यंत वाहन वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.’
महत्त्वाच्या सूचना
अत्यावश्यक तसेच अन्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सध्या शहरात कामानिमित्त जाण्यास सवलत देण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार असून किराणा माल, औषधे, फळभाज्यांच्या विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र, निवासस्थान तसेच कार्यालयाचा पुरावा जवळ बाळगावा. आपत्कालिन, वैद्यकीय सेवेसाठी डायल रिक्षा (मोबाइल क्रमांक 98509198591 ) या ऍपचा वापर करावा. रुग्ण वाहतुकीच्या वेळी रुग्णालयातील कागदपत्रे बाळगावी.