पिंपरीमधील 92 केंद्रांची अदला – बदली

दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्रांमध्ये बदल

पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक विभागही जोमाने कामाला लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदारांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी विधानसभा मतदारसंघातही काही मतदारसंघामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दिव्यांग व वृध्द मतदारांची सोय व्हावी, यासाठी 92 शाळेतील मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात येणार असून ही सर्व मतदान केंद्र पहिल्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या महिन्यातच अंतिम मतदान यादी प्रसिध्द झाल्यानंतर आता मतदान केंद्राची तयारी पूर्ण करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्येही निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घटला होता. त्यामुळे, या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही 399 बूथ असणार आहेत. मात्र, यावेळी मतदारसंघामधील जवळपास 92 मतदान केंद्राची जागा बदलण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघामधील 100 मतदान केंद्रेही दुसऱ्या तसेच तिसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळे, अपंग तसेच वृध्द मतदारांना मतदानासाठी जाताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत यातील काही मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, काही मतदान केंद्रे जागे अभावी दुसऱ्या मजल्यावर होती.

त्यामुळे, अपंग तसेच वृध्द मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. ही बाब ओळखून येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार, 92 मतदान केंद्रामधील जागा बदलण्यात येणार आहेत. त्यापैकी, काही शाळेतील मतदान केंद्र बदलून दुसऱ्या शाळेमध्ये नेण्यात येणार आहे. तर काही शाळेमधील मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.