मंचर (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यात निरगुडसर, जवळे व पश्चिम आदिवासी भागातील शिनोली येथे तीन पुरूषांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे . रविवारी ( दि. २४ ) या तिनही रुग्णांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुरेश ढेकळे यांनी दिली . यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे . प्रशासनाच्या वतीने वरिल तिनही गावे ही सिल करण्यात आली आहे .
निरगुडसर, जवळे, शिनोली या गावांमध्ये चार पाच दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण मुंबई वरून गावाला आले आहेत .परंतू त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना पुणे येथिल रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते . रविवारी ( दि. २४ ) दुपारी या तीनही रुग्णांचे वैद्यकीय अहवाल हे पॉझिटिव्ह आले . त्यामुळे आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे व घबराट पसरली आहे . प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या गावांना जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी केली असून गावे सिल केली आहेत .
तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी , गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार आदी पदाधिकाऱ्यांनी वरिल गावांना भेट दिली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आंबेगाव तालुक्यामध्ये यापूर्वी साकोरे येथे कोराेना बाधित रुग्ण आढळून आला आहे. आता निरगुडसर, जवळे, आणि शिनाेली येथे दुसरा रुग्ण आढळून आला आहे. यामुळे तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकुण पाच झाली आहे. हे रुग्ण मुंबई येथून आलेले असल्याने मुंबई करांमुळेच आंबेगाव तालुक्यात काेराेनाचा शिरकाव झाल्याचे नागरिक सांगत आहेत.