चोर घाबरले की शहर सोडून पळाले?

पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. यामुळे दिवसरात्र पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात शहरातील गुन्हेगारी थंडावली आहे. यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. “करोना’ला घाबरुन चोरही कोणत्याही वस्तूला स्पर्श करत नाहीत की “करोना’मुळे शहर सोडून पळाले आहेत? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून “करोना’ने शहरात प्रवेश करण्यापूर्वी दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात होती. तसेच घरफोडीचेही तीन चार गुन्हे दररोज दाखल होत होते. विनयभंग आणि हाणामारीचेही गुन्हे दाखल होत होते. यामुळे पिंपरी चिंचवड शहराची क्राईम सिटीकडे वाटचाल होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. मात्र गेल्या गुरुवारपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. याचा परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. शहरातील वाहनाचोरी सध्या पूर्णपणे थांबली आहे. नागरिक घराबाहेरच पडत नसल्याने विनयभंग आणि हाणामारीच्या घटनाही पूर्णपणे थांबल्या आहेत. नागरिक दिवस रात्र घरातच असल्याचे घरफोडीचे प्रकारही बंद झाले आहेत.

एकीकडे गुन्हेगारी थंडावली असली तरी दुसरीकडे मात्र प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याचे गुन्हे वाढत आहेत. ठिकठिकाणच्या भागामध्ये दुकानदार पुढून दुकानाचे शटर बंद करून मागील दरवाजाने कारभार सुरू ठेवत आहेत. याबाबतही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करीत आहेत. याशिवाय संचारबंदीच्या आदेशाचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारल्यामुळे टवाळखोरांच्या कारवायांवर अंकुश आला आहे.

अपघात, आत्महत्याही घटल्या
शहरात दिवसाला एकतरी आत्महत्याची आणि अपघातात मृत्यूची घटना यापूर्वी घडत होत्या. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई करणारा आदेश पोलिसांनी काढला असल्याने गेल्या आठवडाभरात अपघातचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याचप्रमाणे “करोना’मुळे निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणामुळे आत्महत्याच्या घटनाही घडताना दिसून येत नाहीत. पोलीस ठाण्यांमध्ये सर्व्हेलन्स, पासपोर्ट, एलसीबी, पोलीसकाका, बडीकॉप, ज्येष्ठ नागरिक विभाग असे अनेक विभागात पोलिसांना काम करावे लागते. संचारबंदीमुळे सध्या ही कामेदेखील बंद असल्याने येथील पोलिसांनाही बंदोस्तासाठी नियुक्‍त करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरील पोलिसांची उपस्थिती जागोजागी जाणवत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.