अवांतर वाचन साहित्य, नाटकांची सोशल मीडियावर रेलचेल

पुणे – लॉकडाऊन कालावधीत कोणीही अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सोशल मीडियावर अवांतर वाचन साहित्य आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या नाटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हे साहित्य बहुतांशी नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे.

जमावबंदी, जनता कर्फ्यू, संचारबंदी आणि आता 21 दिवसांचा लॉकआऊट यामुळे नागरिक घरी बसून आहेत. तर टीव्हीवरच्या मालिका, बातम्या, चित्रपट पाहण्याचा आता कंटाळा येऊ लागला आहे. त्यामुळे हा तोचतोचपणा घालवण्यासाठी नेटकऱ्यांनी शक्कल लढवली आहे.

वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या अनेक गाजलेल्या कादंबऱ्या, गूढ कथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्धकथा, गुप्तहेर कथा, युरोपातील लेखकांची गाजलेली मराठी भाषेतील अनुवादित साहित्य, ललित लेखनासारखे साहित्य पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठी मेजवानी मिळत आहे. त्यामध्ये अगदी शंभर ते साडेचारशे पृष्ठसंख्या असलेले वाङ्‌मय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, व. पु. काळे, रणजित देसाई, सुधा मूर्ती, रत्नाकर मतकरी या प्रतिभावान साहित्यिकांच्या साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येत आहे. याशिवाय वाचकांच्या पसंतीस उतरलेले अनेक दिवाळी अंकांचीदेखील यात भर पडली आहे.

साहित्य आणि नाटकांनंतर नेटवर अवघे काही जीबी खर्चून जुन्या गाण्यांचा संग्रहित संचदेखील आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सिनेरसिकांच्या मनावर गारुड असलेल्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा समावेश आहे. या गाण्यांमुळे जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळत आहे, असे काही नेटकऱ्यांनी सांगितले.

नाटकांच्या लिंकही उपलब्ध
दर्जेदार साहित्याबरोबरच एकेकाळी मराठी मनावर अधिराज्य गाजवलेल्या अनेक नाटकांच्या लिंकदेखील सोशल मीडियावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, अविनाश खर्शीकर, अतुल परचुरे यांच्यापासून अलीकडच्या काळातील सिद्धार्थ जाधवच्या कसदार अभिनयाचा समावेश असलेल्या अनेक नाटकांचा समावेश आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकआऊटमुळे सोशल मीडियावर दर्जेदार साहित्य, नाटके आणि उपलब्ध होणारी गाणी नागरिकांचे मनोरंजन करणारी आहेतच, तर साहित्यामुळे ज्ञानातही भर घालत आहे. त्यामुळे आगामी 21 दिवसांचा लॉकआऊट सुसह्य होण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. तर वाचन संस्कृतीलादेखील हातभार लागणार आहे.
– ज्ञा. ग. चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.