परदेश प्रवासाचा इतिहास असणाऱ्यांची होणार तपासणी
पुणे – करोना बाधित देशातून आलेले प्रवासी नजरेतून सुटू नये, यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे, जुना महामार्गाबरोबरच रेल्वे स्थानकावर “थर्मल स्कॅनर’ बसवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 50 थर्मल स्कॅनर मागवण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
करोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाकडून विविध उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेले काही प्रवासी हे तपासणी न होताच बाहेर आले असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर काही प्रवासी हे रेल्वे, तसेच पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरून वाहनातून येतात. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी हे स्कॅनर मागविण्यात आले आहेत. परदेशी प्रवासाचा इतिहास असणाऱ्या व्यक्तींची यामध्ये तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या ठिकाणी हे तपासणी पोस्ट उभारावेत, त्यांची ठिकाणी अद्याप निश्चित झालेले नाहीत.
ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निश्चित होतील. तसेच सर्वाधिक रेल्वे प्रवासी उतरणाऱ्या स्थानकाची माहिती घेण्यात येत असून त्यानंतर हे थर्मल स्कॅनर बसविले जातील.
यंत्रसामग्री तातडीने मिळणार
प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक असलेली यंत्रसामग्री, एन-95 आणि सर्जिकल मास्क यांची जेवढी आवश्यकता आहे. त्यांची माहिती अन्न व औषध प्रशासनाला उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून 2 हजार एन 95 मास्क शुक्रवारी सकाळपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.