कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महायुतीचा विजय निश्‍चित – कांबळे

शेट्टी, जनज्योत यांच्या प्रवेशानंतर समीकरणे बदलणार

पुणे  – निवडणुकीच्या तोंडावर कॅन्टोन्मेंट मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सदानंद शेट्टी आणि सुधीर जानज्योत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील समीकरणे बदलली असून भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्‍चित असल्याचा असल्याचा दावा कॅन्टोन्मेंटमधील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सहयोगी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांच्या उपस्थितीत शेट्टी आणि जानज्योत यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. यासाठी बिडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली.

याबाबत कांबळे म्हणाले, शेट्टी हे देखील कॅन्टोन्मेंटच्या परिसरातील वजनदार राजकीय नेते. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषवत त्यांनीही अडीच दशकांची कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्या पत्नीही विद्यमान नगरसेविका आहेत.

शेट्टी हे त्यांच्या कामामुळे या परिसरातील झोपडपट्टी भागात परिचित आहेत. तर जानज्योत यांनीही मेहतर समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक तसेच सामाजिक प्रगतीसाठी मोठी भूमिका बजाविली आहे. त्यामुळे दोन जाणत्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्ष, महायुती आणि मतदानाच्या दृष्टीने मोठा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणात मतदार भाजपच्या पाठिशी उभा राहील.

झोपडपट्टी भागातील गरिबांसाठी काम केल्याने माझा त्यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून दैनंदिन संपर्क आहे. या अत्यंत गरीब लोकांसाठी मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने थेट लाभाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे या गरिबांना दिलासा मिळाला आहे. म्हणूनच पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक

मेहतर समाजाच्या भल्यासाठी गेली अनेक वर्षे कॉंग्रेस पक्षात काम केले. परंतु समाजाच्या स्थितीत फार बदल झालेला नाही. अनेक समस्या अजूनही कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली समाजाच्या विकासाला आणखी गती मिळू शकेल, अशी आशा आहे.

-सुधीर जानज्योत, माजी नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.