कन्नौज – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इरादा बदलून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांनी गुरूवारी उत्तरप्रदेशच्या कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. सपने याआधी कन्नौजमधून अखिलेश यांचे पुतणे तेजप्रताप यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती. स्वत: अखिलेश यांनी राज्यातच काम करण्याचा मानस बोलून दाखवला होता.
मात्र, आता पुतण्याच्या जागी त्यांनी स्वत: दंड थोपटले आहेत. कन्नौजमधून मी स्वत: निवडणूक लढवावी अशी जनतेची आणि सप कार्यकर्त्यांची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया अखिलेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिली. भाजपचे काही नेते निवडणुकीची तुलना भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट मॅचशी करत आहेत.
त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अखिलेश यांनी क्रिकेटच्या भाषेतच उत्तर दिले. भाजपचे नेते बॉल फेकू शकणार नाहीत अन् बॅटही वापरू शकणार नाहीत. सर्व चेंडूंवर आम्ही षटकार मारू, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. तसेच, भाजपला क्लीन बोल्ड करण्याचे आवाहन जनतेला केले.
अखिलेश तीनवेळा कन्नौजमधून खासदार बनले. त्यांनी २०००, २००४ आणि २००९ यावर्षांतील निवडणुकांत तिथून विजय मिळवला. मागील वेळी (वर्ष २०१९) त्या मतदारसंघात सपने अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांनी त्यांचा पराभव केला.
यावेळी विद्यमान खासदार असणाऱ्या पाठक यांचा मुकाबला अखिलेश यांच्याशी होईल. लोकसभा निवडणुकीत सपची कामगिरी चांगली व्हावी आणि पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे या उद्देशातून अखिलेश रिंगणात उतरल्याचे मानले जात आहे.