…म्हणून जगात सर्वाधिक सुखी मुस्लिम बांधव भारतात

संघप्रमुख मोहन भागवत यांच्याकडून हिंदूत्वाचा पुनरोच्चार

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश हा केवळ हिंदू समाजाला संघटित करणे नसून भारतात परिवर्तन तसेच चांगल्या भविष्याकडे नेण्यासाठी देशातील संपूर्ण समाजाला संघटित करणे हा आहे. यहुदी (ज्यू) समाज इकडे-तिकडे फिरत होता. त्यांना भारतात आश्रय मिळाला. पारसी समाजाची पूजा आणि मूळ धर्म केवळ भारतात सुरक्षित आहे. जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात मिळतील. हे का आहे ?, कारण आम्ही हिंदू आहोत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ.मोहन भागवत यांनी केले.

भुवनेश्वर येथे संघाच्या आघाडीच्या निर्णय निर्धारण संस्था अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. समाजाला एकजूट करणे आवश्‍यक आहे, आणि सर्व वर्गांना एकत्रित पुढे गेले पाहिजे यासाठी आरएसएस त्या दिशेने काम करत आहे. आमची कोणाच्याही प्रती घृणा नाही. एक चांगला समाज करण्यासाठी आपल्याला एकत्रित पुढे गेले पाहिजे. ज्यामुळे देशात बदल आणता येईल. त्याची विकासाला मदत होऊ शकेल.

आमची ही इच्छा आहे की, आरएसएस तथा समाज एक समूह म्हणून काम करावे. सर्व श्रेय समाजाला देऊ. भारताच्या विविधतेची प्रशंसा करत त्यांनी संपूर्ण देश एक सूत्रात बांधला गेला आहे, असे म्हटले.  भारताचे लोक विविध संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थान असतानाही स्वतःला एक मानतात. एकतेच्या या अनोख्या जाणिवेमुळे मुस्लिम, पारसी आणि इतर धर्माशी संबंधित लोक देशात सुरक्षित समजतात. पारसी भारतात खूप सुरक्षित आहेत आणि मुस्लिमही खूश आहेत.

समाजातील बदल घडवण्याच्या दिशेबाबत ते म्हणाले की, यासाठी उत्कृष्ट मनुष्य तयार केला पाहिजे, जो समाज बदलण्यासाठी तसेच देशाचा कायापलट करण्यात महत्वाची भूमिका अदा करेल. कारण 130 कोटी लोकांना एकत्रित बदलणे शक्‍य नाही. समाजात बदल आणणे आवश्‍यक आहे, म्हणजे देशाचे नशीब बदलेल आणि त्यासाठी उत्कृष्ट मनुष्य तयार करणे आवश्‍यक आहे. असा व्यक्ती ज्याचे चांगले चरित्र असावे, जो प्रत्येक रस्ता तसेच शहराचे नेतृत्व करण्यात सक्षम असावा.

Leave A Reply

Your email address will not be published.