चिंचवडमध्ये हिशोब ‘ओके’

उमेदवारांच्या खर्चात तफावत नाही : सर्वाधिक खर्च जगतापांनी केला

पिंपरी – चिंचवड विधानसभेच्या उमेदवारांनी शुक्रवारी सादर केलेल्या खर्चामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात खर्चाला आखडता हात घेतला असल्याचे दिसून येत आहे. इतर उमेदवारांनी अत्यल्प खर्च केला असला तरी भाजप महायुतीचे लक्ष्मण जगताप यांची गाडी मात्र खर्चामध्ये पुढे निघून गेली आहे. जगताप यांनी चार दिवसांत 1 लाख 43 हजार रुपये खर्च केले आहेत. तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केवळ 24 हजार 650 रुपये खर्च केले आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच उमेदवारांच्या खर्च मोजायला सुरुवात होत असते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात यावेळी 11 उमेदवारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. अर्ज भरल्यापासून प्रचार संपेपर्यंत प्रत्येक दिवशी केलेल्या खर्चाचा हिशोब उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. त्यासाठी, अर्ज दाखल केल्यानंतरच निवडणूक विभागाच्या वतीने उमेदवारांना खर्च मांडण्यासाठी नोंदवही दिलेली असते. काल, दि. 11 ऑक्‍टोबर रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व 11 उमेदवारांच्या खर्चाची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. त्यानंतर कोणत्या उमदेवाराने किती रुपये खर्च केला हे समोर आले आहे.

चिंचवड मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप यांनी सर्वाधिक 1 लाख 43 हजार 600 रुपये खर्च केला आहे. यामध्ये अर्ज भरण्यासाठी काढलेली रॅली, त्यातील विविध पथके, फटाके, हार, याबरोबरच प्रचारातील गाड्यांचा खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे. राहुल कलाटे यांनी आत्तापर्यंत केवळ अर्ज भरण्यासाठी जाताना तसेच प्रचारासाठी लागणारे साहित्य यासाठी केवळ 24 हजार 650 रुपये खर्च केला आहे. त्यामुळे, पहिल्या टप्प्यात कलाटे यांनी खर्चासाठी आखडता हात घेतला आहे.

याबरोबरच अपक्ष मिलिंदराजे भोसले यांनी 7 हजार 360, जनहित लोकशक्‍ती पार्टीचे नितीश दगडू लोखंडे 12 हजार 25, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र बापू लोंढे 11 हजार 290, अपक्ष रवींद्र विनायक पांढरे यांनी 19 हजार 600, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती यांनी 16 हजार 338, सुरज खंदारे यांनीही 5 हजार 998, राजेंद्र काटे, बसपाचे एकनाथ नामदेव जगताप यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्य अनामत रक्कमेव्यतिरिक्‍त इतर खर्च केलेला नाही.

शेतकरी कामगार पक्षाच्या छाया देसले यांनीही अनामत रक्कम तसेच स्टेशनरीसाठी 11 हजार रुपयांचा खर्च केला आहे. उमेदवारांनाही अर्ज भरल्यापासून दि. 8 ऑक्‍टोबर पर्यंतच्या खर्चाची तपासणी करण्यात आली आहे. उमेदवारांनी नोंदवहीमध्ये लावलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलेल्या खर्चाचा ताळमेळ लावला असून कोणत्याही उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली नाही. त्यामुळे चिंचवडच्या उमेदवारांचा पहिल्या टप्प्याचा हिशोब निवडणूक विभागाच्या दृष्टीने योग्य ठरला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.