सांगवी – सांगवी फाटा ते बॅंक ऑफ महाराष्ट्र चौक दरम्यान महापालिकेच्या वतीने रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा साधनांअभावी वाहनचालक, दुचाकीस्वारांना सांगवी फाट्याकडे जाताना काळजी घ्यावी लागत आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना पुरेशा प्रमाणात बॅरिकेट्स न लावल्याने वाहन घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच सुरक्षेसाठी महापालिकेने बॅरिकेट्स लावणे गरजेचे आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असून, रस्त्याच्या एका बाजूची खोदाई केल्यामुळे वाहने किंवा दुचाकी घसरून अपघात होऊ शकतात. याचे महापालिकेला काही देणेघेणे नसून, गेल्या अनेक महिन्यांपासून असुरक्षितपणे काम सुरू आहे. अगोदरच संथगतीच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. टप्प्याटप्प्याने रस्त्याची खोदाई न करता सांगवी फाटा ते बॅंक ऑफ महाराष्ट्र चौकापर्यंत रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. हा रस्ता अगोदरच अरुंद आहे. बाजूला मिलिटरीची जागा असल्याने रस्ता वाढवता येत नाही. त्यातच रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना बाजूच्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाहतूकही मंदावते. तसेच या कामात गेल्या अनेक दिवसांपासून दिरंगाई होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करत आहेत. त्यांना देखील याचा त्रास होत आहे.
वाकड कडून येणारी वाहने पिंपळे गुरव, सांगवी, दापोडीकडे जाण्यासाठी आणि पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडीकडून औंध, पिंपळे निलख, वाकडकडे जाण्यासाठी वाहनचालक याच मार्गाचा वापर करतात. आयटी कंपनीतील बहुतांश कामगार हे या परिसरात राहत असल्याने त्यांना या ठिकाणी रखडलेल्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सुरक्षेसाठी बॅरिकेट्स न लावल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर आवश्यक तिथे बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या परिसरातून पुणे शहराकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महापालिकेने येथे रस्त्याचे काम सुरू केले. मात्र, या धोकादायक रस्त्यावर लोंखडी बॅरिकेट्स पुरेशा प्रमाणात लावलेली नाहीत. साधी रेबिन लावून वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तातडीने बॅरिकेट्सची संख्या वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– प्रदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते.