पिंपळे गुरव (संगीता पाचंगे ) -दापोडी येथील श्री फिरंगाई देवीचा उत्सवात 75 वर्षीय आजीबाईंनी लाठी-काठीची केलेली प्रात्यक्षिके पाहून सर्वजण थक्क झाले. दापोडीत देवीच्या उत्सवात लावण्या, गाणे इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले होते. परंतु वयोवृद्ध आजी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीमध्येदेखील तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर करताना आजीबाई अर्थात शांता पवार यांचीच मोठी चर्चा सुरू होती.
आज-काल माणसाचे वयोमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. सर्वसामान्य नोकरी करणारे नोकरदार हे वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतात आणि आराम करतात. हे खरोखरच आपण पाहिले तर सर्वसामान्य कुटुंब म्हणजेच ज्यांच्या हातावरचे पोट आहे कष्टकरी आहेत त्यांच्या नशिबी तर मरेपर्यंत कष्टच असते. त्यामुळे वयोमान वाढून देखील शारीरिक कष्ट आणि कसरती कराव्या लागत आहेत.
दापोडीतील उत्साहात त्या दरवर्षी भाग घेतात. आपली कला लोकांसाठी सादर करतात. नातवंडे खेळवण्याचा त्यांचे दिवस पोटासाठी त्या कधी नातवंडांना कडीपाठीवर घेऊन तर कधी हातामध्ये काठी घेऊन त्या खेळ करताना दिसतात. गेले कित्येक वर्षांपासून दरवर्षी न चुकता ते दापोडीच्या उरुसामध्ये खेळाची प्रात्यक्षिके सादर करतात. आजीबाई आपल्या घरातील कौटुंबिक परिस्थितीमुळे कधी बाटलीवर चालणे तर कधी हातात काठी घेऊन खेळ खेळणे अशी विविध प्रात्यक्षिके सादर करतात.
मनोरंजनाची साधने वाढल्याने कला दुर्लक्षित
पूर्वी पारंपरिक कलेला महत्त्व होते. गावातील उत्सवात या खेळ सादर करणारांना मोठी गर्दी होत होती. त्यात डोंबारी, गारुडी, वासुदेव, पोतराज तसेच नंदीवाले, माकडवाले गावागावांत खेळ करत हिंडायचे. लोकांचे मनोरंजन उपजीविका करायचे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत होता. परंतु सध्या नागरिकांना मनोरंजनासाठी मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर आदी साधने उपलब्ध झाल्याने पारंपरिक कलाकारांची उपासमार सुरू झाली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी हा खेळ
शांता पवार म्हणाल्या माझे वय 75 वर्षांचे आहे. या वयात आपल्या घरातील माणसं निवांत असतात. परंतु माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या उतारवयात देखील मी डोंबाऱ्याचा खेळ करून पैसे कमवत आहे. महागाईच्या जमान्यात दोन वेळच्या अन्नासाठी त्या आपल्या दोन नातींना घेऊन चौका चौकांत कला सादर करतात. आमच्या पदरी मरेपर्यंत कष्ट करणेच आहे. शांताबाई अजूनही न थकता आपली कला सादर करतात. त्यामध्ये दोरीवरून चालणे, लाठी चालविणे, काचेच्या बाटलीवर उभे राहणे आदी खेळ त्या सादर करतात. परंतु नागरिक आमच्या कलेची कदर करताना दिसून येत नाहीत.