विमाननगर येथील घरमालकाच्या कृतीमुळे खळबळ
पुणे – करार संपल्यानंतर सदनिका न सोडल्यामुळे घरमालकाच्या कुटुंबीयांनी शिक्षेकला जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोंडले. ही घटना दोन दिवसांपूर्वी विमाननगरमधील गुलमोहर रॉयल सोसायटीत घडली. सदर शिक्षिका ऑनलाइन खासगी क्लासेस घेते.
याप्रकरणी घरमालक मरजाबान वेलाटी (रा. ठाणे) नाहिद वेलाटी, ज्वेल मॉरिस पॉल (रा. विमाननगर) यांच्याविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्लायशा दीक्षित यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लायसा या ऑनलाइन खासगी क्लासेस घेतात. त्यांनी वेलाटी यांची सदनिका भाड्याने घेतली होती. त्यानंतर त्या नियमितपणे घरभाडे देत होत्या. काही दिवसांपूर्वी घराचा करार संपल्यामुळे वेलाटी कुटुंबीयांनी स्लायसा यांना सदनिका सोडण्यासाठी तगादा लावला होता.
मात्र, त्यांनी सदनिका न सोडल्यामुळे दोन दिवसांपूर्वी वेलाटी कुटुंबीय तेथे गेले. तेथे त्यांनी स्लायसाला घर सोडण्यासाठी शिवीगाळ केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन सदनिकेला बाहेरून कुलूप लावले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाने करत आहेत.